आयुष्याच्या वळणावर अनेक माणसं आपल्याला भेटत असतात. प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे ते आपल्या जीवनावर प्रभाव टाकतात. या माणसांच्या सहवासात राहिल्याने एक सकारात्मक ऊर्जा आपण अनुभवत असतो. ती माणसं नकळतपणे आपल्याला जगण्याची नवी उमेद देतात. मला प्रभावित करणारं असंच एक व्यासंगी व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये मॅडम…
एखाद्या व्यक्तीकडे पाहिलं की “किती भारी आहेत यार ती / तो/ त्या”, असं जेव्हा आपल्या तोंडून निघतं तेव्हा समजायचं, ‘इस इन्सान में कुछ तो खास बात जरूर है!’…माझ्याही बाबतीत असंच घडलं. गरवारेची माध्यम व्यवस्थापन विषयाची पत्रकारिता विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आलीय, असं मला कळलेलं. त्यामुळे त्या कार्यशाळेनिमित्त मी तिथे गेलेले. तेव्हाच तिथे पत्रकार, लेखिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीला उपाध्ये मॅडमशी वरवरची पहिली भेट झाली. हे त्यांचं अफाट कर्तृत्त्व मला तेव्हा इतक्या जवळून माहित नव्हतं, ती गोष्ट वेगळी. जेव्हा भेटले तेव्हा ‘आजीच आहेत या आपल्या जणू ‘ या नजरेतून पाहत होते मी त्यांना. तेव्हाच मनात आलं की “या आजी किती भारी आहेत यार”…हो, आजीच म्हणालेले मी! मी आणि माझी मैत्रीण एकत्र गेलेलो त्या कार्यशाळेसाठी. तेव्हा मी मैत्रिणीला आणि तिने मला म्हटलं, “अशा आजी भेटायला हव्यात यार आयुष्यात. कसल्या मस्तयंत.” त्या पहिल्याच भेटीतही एकमेकांना आपली ओळख करून देतानाच्या सत्रात त्या (नीला मॅडम) सगळ्यांना उलटसुलट प्रश्न विचारत होत्या, तर त्याच्या दुसऱ्या बाजूलाच आताच्या पिढीलाही हसू येतील असे छान विनोदही करत होत्या. त्यामुळे त्या दिवशी त्यांना भेटून खूप छान वाटलं.
पुढे भेट झाली त्यांची ती मुलाखतीच्या (इंटरव्हूच्या) वेळेला. तेव्हा मुलाखतीसाठी त्यांच्या खोलीत जाणार तर गरवारेतील शिपाई दादाही त्यांच्याशी मस्करी करत मस्त बोलत होते. त्यामुळे आत जाताना थोडं दडपण कमी झालं. आणि मुलाखतीसाठी त्यांच्याशी बोलायला लागले तेव्हा खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून. त्यानंतर जसे लेक्चर सुरू होत गेले तसा त्यांच्याशी परिचय वाढतंच गेला. आणि त्यांच्याबद्दल ऐकून, त्यांच्या कार्याबद्दल वाचून, त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा, पंचाहत्तरीच्या घरात पाऊल असताना सतरा वर्षाच्या तरुणीलाही लाजवेल अशी त्यांची लगबग पाहून वाटायचं या कमाल आहेत. यांसारखं आपल्याला होता यायला हवं.
नीला मॅडम यांविषयी जसं इतरांकडून मी ऐकत गेले, वाचत गेले, त्यांच्याशी बोलू लागले तेव्हा कळलं, यांचं कार्य अफाट आहे. कारण एका आगरी समाजातील छोट्याशा घरातून आलेल्या मुलीने त्या काळात (१९७० साली) पुरुषांचं मानलं जाणाऱ्या क्षेत्रात मराठी पत्रकारितेतील पहिली पूर्णवेळ महिला वार्ताहर म्हणून ठसा उमटवणं, राजकीय वृत्तांकन करणारी महिला बनणं नक्कीच सोपं नसणार. कारण ‘पहिलं’ काहीतरी करायचं असेल तेव्हा त्यामागे प्रचंड कष्ट आणि मेहनत असल्याशिवाय यश मिळत नसतं. त्यामुळे आपल्या इच्छाशक्तीने आणि जबर मेहनतीने नीला मॅडम यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपली छाप पाडली आहे हे तर निश्चितच. आजपर्यंत त्यांना ढीगभर पुरस्कार मिळाले आहेत. तसेच नोकरी – संसार सांभाळून १९-२० पुस्तकांचे लेखनही त्यांनी केलंय. हे पत्रकारितेच्या सतत धावपळीच्या जगात करणं सोपं नक्कीच नसावं. त्यामुळे साहित्यिक म्हणूनही समाजमनावर पत्रकाराबरोबरीने त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. सेन्सॉर बोर्डवर सदस्या म्हणूनदेखील आठ – नऊ वर्षे त्यांनी काम केलं आहे.
आपल्या वृत्तपत्रातील सामान्य वाचकापासून ते दि. वि. गोखले, बाळासाहेब ठाकरे यांसारख्या बड्या व्यक्तींचे आशीर्वाद त्यांना त्यांच्या माणसांना आपलंसं करण्याच्या स्वभावामुळे लाभले. आजपर्यंत जसे ग्रंथ – चित्रपट समीक्षा, विशेष बातम्या यांतून लाखो शब्द त्यांनी लिहिले आहेत तशी लाखो माणसं त्यांच्या पारदर्शी स्वभावामुळे त्यांनी आपलीशी केली आहेत. आपल्याला आयुष्यात ज्यांनी सहकार्य केलं, अभिमानाने उभं राहण्यासाठी बळ दिलं त्यांच्याबद्दलची आपुलकी नीला मॅडमच्या कृतीतून जाणवते. कृतज्ञ भाव तर गुरुंविषयी असलेल्या त्यांच्या मनातील भावनांतून, त्यांनी त्यांच्याविषयी लिहिलेल्या लेखणीतून आणि त्यांच्यासाठी केलेल्या कार्यातून प्रकर्षाने जाणवतो. म्हणजेच फक्त एका प्रेमळ वाक्यासाठी शांताबाईंना आपलं मानणाऱ्या नीला मॅडम यांनी ‘शब्दवर्ती शांताबाई’ हे चरित्र आपल्या ओघवत्या शैलीत लिहिलं. तर पत्रकारितेत आपले गुरू मानणाऱ्या त्यांच्या गोखले काकांवर त्यांनी ‘ दि. वि. गोखले व्यक्तित्व व कर्तृत्व ‘ हा ग्रंथ लिहिला आहे.
‘समाजासाठी काम करत राहणं ही आमच्या गुरूंनी दिलेली शिकवण आहे. गुरूंनी दिलेला वसा आहे. म्हणून मी या वयातही घरात शांतपणे बसून, पुस्तकं लिहायची सोडून, तुम्हाला शिकवायला येते. कारण गुरूंची शिकवण आहे ही आमच्या.” असं जेव्हा त्या म्हणतात तेव्हा त्यांच्या कृतज्ञतेचं, गुरुंविषयी असलेल्या त्यांच्या मनातील आपलेपणाचं दर्शन स्पष्टपणे घडतं. एखाद्याने जर समाजासाठी काही विशेष काम केलं तर त्या व्यक्तीचं त्यांना मनापासून कौतुक वाटतं. आणि जर ती व्यक्ती परिचयातील असेल तर कॉल करून त्यांचं त्या आवर्जून कौतुकही करतात.
कोणत्याही ठिकाणी दहा मिनिटं आधी पोहोचण्याच्या वक्तशीरपणाची तर प्रत्येकालाच अनुभूती आली आहे. त्यांच्या निर्भीडपणाचे दर्शन हे ‘ पळकुटे नेमाडे ‘ या लेखापासून ते बाळ ठाकरेंना भर सभेत कठोर भाष्य करण्यासाठी दाखवलेल्या आत्मविश्वासातून स्पष्टपणे दिसून येते. आपल्या माणसांवर जीवापाड प्रेम करायचं आणि जो विनाकारण वाटेत आला त्याला धारातीर्थी पाडायचं, या एकीकडे कृतज्ञ तर दुसरीकडे बंडखोर व्यक्तिमत्त्वाचं त्यांच्या कौतुकच वाटतं मला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचं आणि कामापायी सतत तत्पर राहण्याचे तर अनेकांनी कौतुगोद्गार काढले आहेत. त्यांच्यावर एखादी जबाबदारी टाकली की, त्या ती तडीस नेणार हे तर त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. ‘कुठेही आपण गेलो, कितीही आपल्याला कष्ट करावे लागले, कोणीही आपल्या विरुद्ध उभं राहिलं तरी आपलं नाणं खणखणीत असायला हवं. तेव्हाच आपण कोणत्याही वादळाला शमवू शकतो. काम करायला अजिबात घाबरायचं नाही पोरांनो. पोरींनो तुम्ही तर समाजात वावरताना आपला काष्टा गच्च धरून ठेवायचा म्हणजेच काय स्त्री म्हणून वावरताना आपण स्वतःला इतकं खंबीर बनवायचं की लोकांनी तुम्हाला सलाम ठोकायला हवा.’ ही त्यांची वाक्य आम्हा विद्यार्थ्यांना जगण्याची उमेद देत असत. संकटांना सामोरं जाण्यासाठी नवं बळ देत असत.
विद्यार्थी म्हणून जशा त्या ग्रेट होत्या ( आहेत ) तशा आज एक अद्यापिका (शिक्षक) म्हणूनही त्या कमालच आहेत. कारण वयाच्या सत्तरीतही आपले विद्यार्थी घडवण्यासाठी घेत असलेल्या त्या मेहनत, त्यांना एक चांगलं माणूस घडवावं म्हणून चाललेली त्यांची धडपड, आपल्या जीवनानुभवांनी विद्यार्थ्यांना एक चांगला नागरिक घडवण्यासाठी करत असलेल्या त्या रक्ताचं पाणी, ‘माणुसकीची किंमत जगात कधीही वरच असते’ हे त्यांचे बोल…हे सारं काही खरंच वर्गातील शिकवण्यापलीकडील जगण्याची शिकवण देऊन जातं.
आज वयाच्या पंचाहत्तरीत कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा कोणाही व्यक्तीला लाजवते. त्यांना या वयातही अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहावं असं वाटतं, त्या कार्यक्रमांना आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन जावं वाटतं, त्या कार्यक्रमांतून त्यांनी स्वतःही आणि विद्यार्थ्यांनीही नवं काहीतरी शिकावं असं वाटतं, वर्षातून दोन पुस्तके लिहाविशी वाटतात, नवनवीन विषयांवर संशोधन करावं असं वाटतं. हे खरंच अफाट आहे. हल्लीच त्यांनी एशियाटिक सोसायटीची फेलोशिपही मिळवली. त्या फेलोशिपच्या निमित्ताने तयार केलेल्या संशोधन पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर करण्याची मागणी त्यांना मुंबई वस्तू संग्रहालयाने केली. आणि त्या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करण्याचे कामही त्यांनी हाती घेतले. यानंतर ‘आणखीन दोन – तीन ग्रंथही पुढे भाषांतरीत करायचे आहेत’ असं जेव्हा त्या म्हणतात, तेव्हा त्यांच्यामध्ये इतका उत्साह येतो कुठून असा प्रश्न मला आणि माझ्यासारख्या इतर भाबड्यांना पडलाच तर नवल ते काय!
आयुष्याच्या वळणावर कधीच स्त्रीत्व न कुरवाळलेल्या, एका सामान्य कुटुंबात जन्माला येऊनही आपल्या हुकुमी आणि काही वेळेला निर्मळ अशा लेखणीने स्वतःच्या नावाचा ठसा समाजमनांवर कोरलेल्या, आम्हा विद्यार्थ्यांना शिक्षकापेक्षा मातृत्वाच्या छायेतून अधिक समजून घेणाऱ्या नीला मॅडम प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहेत. अशा या पत्रकार, साहित्यिक, ‘चित्रपश्चिमा’ कार, समाजसेविका, अध्यापिका नीला मॅडम यांनी केवळ एका वर्षाच्या या काळात आयुष्यभर पुरेल असे मोलाचे कानमंत्र मला दिले आहेत. आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन दिला आहे. संकटांना आत्मविश्वासाने सामोरं जाण्याचं भक्कम पाठबळ दिलं आहे. अशाप्रकारे कित्येकांच्या आयुष्यात ‘प्रकाशवाटा’ निर्माण करणाऱ्या नीला मॅडमचे गुण गौरवावे तितके कमीच…नाही का?
~ प्राजक्ता हरदास.