नौदलाचे अधिकारी ते कॅन्सरग्रस्त मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करणारा विदूषक…

मुलांच्या आयुष्यात आनंद पसरविण्यासाठी त्यांनी विदूषकाचे रुप घेतले. त्यासाठी त्यांनी नौदलाची नोकरीही सोडली. आपल्या मुलासह ते अनाथाश्रम, हॉस्पिटल्समध्ये जाऊन लहान मुलांसाठी खास कार्यक्रम सादर करतात. मुलांसाठी पाच हजारांहून अधिक शो करणाऱ्या प्रवीण तुळपुळे यांच्याविषयी…

‘प्रवीण, अरे काल जो मुलगा होता ना तुझ्याबरोबर, तो नाही राहिला या जगात’…मित्राने जेव्हा हे सांगितले तोच क्षण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. विदूषकाबरोबर खेळायला मिळावे ही त्या कॅन्सरग्रस्त मुलाची शेवटची इच्छा होती आणि ती प्रवीण तुळपुळे यांच्यामुळे पूर्ण झाली होती. त्यानंतर त्यांचे पूर्ण आयुष्य बदलले. ते आणि त्यांचा मुलगा मल्हार तुळपुळे ही वडिल-मुलाची जोडी अनाथाश्रम, हॉस्पिटल्स इथे जाऊन मुलांसाठी खास कार्यक्रम सादर करत असतात. ‘हॅपी क्लाऊन आणि रेड नोज’ बनून ते काम करत आहेत.

० विदूषकांची सामाजिक बांधिलकी

मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी ‘हॅपी आणि चकल’, म्हणजे प्रवीण तुळपुळे आणि मल्हार तुळपुळे ही जोडी नाना करामती करत असते. अलीकडेच ही जोडी दिसली होती मुंबई मॅरेथोनमध्ये. ‘रन इन कॉस्च्युम’ या प्रकारात त्यांनी मॅरेथोनमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावले. गेली बारा वर्ष ही जोडी मुंबई मॅरेथोनमध्ये सहभागी होत आहेत. प्रवीण तुळपुळे हे १७ वर्ष नौदलाच्या सेवेमध्ये होते. लेफ्टनंट कमांडर असलेल्या तुळपुळे यांना अनेक पुरस्कारही मिळाले. लहानपणापासून त्यांना जादू करून दाखवण्याची आवड होती. एकदा त्यांच्या एका मित्राने त्यांना लहान मुलांचे मनोरंजन करण्यासाठी एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. तिथे गेल्यावर त्यांना कळले की ती सगळी मुलं कॅन्सरग्रस्त होती. लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकलो म्हणून ते त्या दिवशी खूप आनंदात होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना रुग्णालयात घेऊन गेलेल्या त्या मित्राचा फोन आला की त्या मुलांमधला एक मुलगा गेला. या घटनेमुळे त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. पेन्शन सुरू व्हायला फक्त दोन वर्ष बाकी असतानाही त्यांनी नौदलातली नोकरी सोडली आणि आता ते हॅपी क्लाऊन आणि रेड नोज बनून काम करत असतात.


० टॉय बँक

टॉय बँक या संस्थेचे ते जुने सदस्य आहेत. लोकांकडून जुनी खेळणी गोळा करायची आणि ती गरीब मुलांपर्यंत पोहोचवायची हे संस्थेचे काम. मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी ते अनाथाश्रम, लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन विदूषक म्हणून कार्यक्रम सादर करतात. आजवर त्यांनी ५ हजारांहून अधिक कार्यक्रम केले आहेत. बऱ्याचदा कोणतेही मानधन न घेता ते हे कार्यक्रम करत असतात.

० रक्तदान
कॅन्सरग्रस्त मुलांना नेहमी रक्ताची आणि प्लेटलेट्सची गरज असते. म्हणूनच त्यांनी #Beabloodychamp नावाची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे तुळपुळे कुटुंबीय स्वत: तीन महिन्यातून एकदा रक्तदान आणि एक महिन्यानंतर प्लेटलेट्स दान करतात. प्रवीण यांनी आजपर्यंत २५० हून अधिक वेळा प्लेटलेट्स दान केले आहे.

Leave a Comment