तरुणांमध्ये बदल घडविण्याची अफाट क्षमता असते. त्यांना योग्य माणसं आणि योग्य वाटा सापडल्या की ते उन्नत असं समाजाभिमुख कार्य करू शकतात. ही बाब दर्शविणारा विचार नुकताच ‘यंग चेंज मेकर्स ऑफ द सिटी – द सोशल लीडर समिट’ या कार्यक्रमात पाहायला मिळाला. द ब्लू रिबन मूवमेंट यांनी अपनालय, युवा, स्नेहा, प्रजा आणि पुकार या संस्थांच्या सहकार्याने YMCA इंटरनॅशनल हाऊस, मुंबई सेंट्रल येथे या सोशल लीडर्स समिटचे आयोजन केले होते.
आजची तरुण पिढी बिघडत चालली आहे. सामाजिक जाणिवा त्यांच्या संपत चालल्या आहेत, अशी एका बाजूला ओरड असताना सामाजिक परिवर्तनाची ज्योत अंगिकारलेल्या १२० हून अधिक युवकांनी या समिटमध्ये सहभाग नोंदविला होता. ही तरुण मंडळी आरोग्य, शिक्षण, नागरिक हक्क, पर्यावरण यांसारख्या अनेक सामाजिक विषयांमध्ये आपल्या सामाजिक जाणिवेतून उत्तम असे कार्य करत आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा या सामाजिक क्षेत्रातल्या तरुण परिवर्तनवादी युवकांना एकत्र आणून, त्यांच्या कार्याचा गौरव करणे हा होता.
या कार्यक्रमामध्ये अनेक सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी, युवा परिवर्तनवादी व्यक्तींनी सहभाग नोंदविला होता. त्यांनी आपल्या सामाजिक बदलाचा प्रवास आणि त्यामागील प्रबळ भावना व्यासपीठावर व्यक्त होताना मांडली. ब्लू रिबन मूवमेंटचे संस्थापक अभिषेक ठाकोर यांच्या कल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबईच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शरथ साळियन आणि चांदणी पारिख या तरुण युवकांच्या सामाजिक कार्याचा गौरव ‘ iCare पुरस्कार ‘ देऊन सन्मान करण्यात आला. तर तीन महिन्यांची कम्युनिटी कनेक्ट फेलोशिप (CCF) पूर्ण करणाऱ्या २४ महाविद्यालयीन युवा परिवर्तनकर्त्यांचा सन्मानदेखील या कार्यक्रमात केला गेला. या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांमुळे मुंबईच्या विकासाची अनेक कामे मार्गी लावण्यात हातभार लागला आहे.
शहरातील समविचारी तरुण तेजांकितांना अशाप्रकारे समिटच्या माध्यमातून एकत्र आणल्यामुळे अनेकांनी कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानले. तर समविचारी तरूणांच्या अशा पद्धतीत एकत्र येण्याने शहरातील अनेक सामाजिक कामांची नांदी या कार्यक्रमामुळे रोवली गेल्याचे यातून निदर्शनास आले.
– प्राजक्ता हरदास.